मनाचे श्लोक : Manache shlok 11 - 20

Continued from page 1


Manache Shlok 11-20


जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे ॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥

मना मानसीं दु:ख आणूं नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी ।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥


मना सांग पां रावणा काय जाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं ।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।
परी शेवटीं काळमूखीं निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥१६॥

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते ।
अकस्मात होणार होऊनि जाते ॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥१७॥

मना राघवेंवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे ॥
जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें ।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥

मना सर्वथा सत्य सोडू नको रे |
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ||
मना सत्य ते सत्य वाचे वदावे |
मना मिथ्य ते मिथ्य सोडूनी द्यावे ||१९||

बहू हिंपुटी होईजे मायपोटी ।
नको रे मना यातना तेचि मोठी ॥
निरोधें पचे कोंडिले गर्भवासी ।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥२० ॥

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Comments