श्रीरामस्तुति - संसार संगे बहु शीणलो मी :shree Ramstuti

संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।
प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १ ॥
मन हे विकारी स्थिरता  न ये रे । त्याचेनि संगे भ्रमतें भले रें ।
अपूर्व कार्या मन हे विटेना ।  तुजवीण रामा मज कंठवेना ॥ २ ॥
मायाप्रपंचीं बहु गुंतलों रे । विशाळ व्याधीमधें बांधलो रे ।
देहाभिमानें अति राहवेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३ ॥
दारिद्र्यदुःखे बहु कष्टलो मी । संसारमायेतचि गुंतलो मी ।
संचित माझे मजला कळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ४ ॥
लक्ष्मीविलासी बहु सौख्य वाटे । श्रीराम ध्यातां मनि कष्ट मोठे ।
प्रपंचवार्ता वदता विटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ५ ॥
अहोरात्र धंदा करितां पुरेना । प्रारब्धयोगें मज राहवेना ।
भवदुःख माझें कधिही टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ६ ॥
तीर्थासि जातां बहु दुःख वाटे । विषयांतरी राहुनी सौख्य वाटे ।
स्वहीत माझें मजला कळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ७ ॥
मी कोठुनि कोण आलो कसा हो । स्त्रीपुत्रस्वप्नातचि गुंतलो हो ।
ऐसें कळोनी मन हे विटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ८ ॥
असत्य वाक्यांनि मुकाच झालो । अदत्तदोषें दुःखी बुडालो ।
अपूर्व करणी कशी आठवेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ९ ॥
अब्रह्ममूर्ती भज रामसिंधू । चैत्यन्यस्वामी निजदीनबंधू ।
अभ्यंतरी प्रेम मनीं ठसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १० ॥
विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं । कुळाभिमानें पडलों प्रवाहीं ।
अशांतुनी दूर कधी कळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ११ ॥
विषयीं जनांनी मज आळवीले । प्रपंचपाशांतचि बूडविले ।
स्वहीत माझें मजला दिसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १२ ॥
नरदेहदोषां वर्णू किती रे । उच्चर माझें मनि वाटती रे ।
ललाटरेषा कधि पालटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १३ ॥
मजला अनाथ प्रभु तूंचि दाता । मी मूढ की जाण असेंचि आतां ।
दासा मनीं आठव वीरसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १४ ॥ 

Comments

  1. प्रपंचिंका माझी सर्व साधनयुक्त असूनही त्यात सुखाची अनुभूती कशी नाही आणि त्यावर उपाय तो फक्त रामनाम व सत्य ज्ञानाचा बोथ..... सुंदर रचना जय जय रघुवीर समर्थ

    ReplyDelete

Post a Comment