श्रीगुरुपादुकाष्टक: shree Gurupadukashkam

खाली गुरुपदुकांचे अष्टक इथे देत आहे. गुरूच्या स्तोत्राच्या नित्य पठणाने मानसिक चिंता दूर होतात, मनोधैर्य वाढते मनोबल वर्धन होऊन साधक योग्य निर्णयाप्रत जातो. सद्गुरू कृपेने संसार सुखमय होतो.आधिव्याधींचा नायनाट होतो, साधक षड्रिपुंवर विजय मिळवतो. तसेच गुरुपादुकांच्या स्मरणाने महत पापांचा लय होतो, भवसागर पार करून साधक मोक्ष प्राप्त करतो अशी या स्तोत्राची फलश्रुती सांगितली आहे.

श्रीगुरुपादुकाष्टक

ज्या संगतीनेंच विराग झाला ।



ज्या संगतीनेंच विराग झाला ।

मनोदरींचा जडभास गेला ।

साक्षात् परमात्मा मज भेटविला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १ ॥

सद्योगपंथें घरि आणियेलें ।

अंगेच मातें परब्रह्म केलें ।

प्रचंड तो बोधरवि उदेला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ २ ॥

चराचरीं व्यापकता जयाची ।

अखंड भेटी मजला तयाची ।

परं पदीं संगम पूर्ण झाला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ३ ॥

जो सर्वदा गुप्त जनांत वागे ।

प्रसंन्न भक्ता निजबोध सांगे ।

सद्भक्तिभावांकरितां भुकेला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ४ ॥

अनंत माझे अपराध कोटी ।

नाणी मनीं घालुनि सर्व पोटीं ।

प्रबोध करितां श्रम फार झाला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ५ ॥

कांहीं मला सेवनही न झालें ।

तथापि तेणें मज उद्धरीलें ।

आता तरी अर्पिन प्राण त्याला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ६ ॥

माझा अहंभाव वसे शरीरीं ।

तथापि तो सद्गुरु अंगिकारीं ।

नाहीं मनीं अल्प विकार ज्याला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ७ ॥

आतां कसा हा उपकार फेडूं ।

हा देह ओवाळुनि दूर सांडूं ।

म्यां एकभावें प्रणिपात केला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ८ ॥

जया वानितां वानितां वेदवाणी ।

म्हणे ' नेति नेतीति ' लाजे दुरुनी ।

नव्हे अंत ना पार ज्याच्या रुपाला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ९ ॥

जो साधुचा अंकित जीव झाला ।

त्याचा असे भार निरंजनाला ।

नारायणाचा भ्रम दूर केला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १० ॥

॥ इति गुरुपादुकाष्टक संपूर्ण ॥

श्री सद्गुरुनाथ महाराज की जय 




Comments