Manache Shlok 41-50 |
बहू हिंडता सौख्य होणार नाही ।
शिणावे परी नातुडे हीत काही ॥
विचारे बरे अंतरा बोधवीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४१ ॥
बहुतांपरी हेचि आता धरावे ।
रघूनायका आपुलेसे करावे ॥
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४२ ॥
मना सज्जना एक जीवी धरावे ।
जनीं आपुले हीत तुवां करावे ॥
रघूनायकावीण बोलो नको हो ।
सदा मानसी तो निजघ्यास राहो ॥ ४३ ॥
मना रे जनीं मौनमुद्रा धरावी ।
कथा आदरे राघवाची करावी ॥
नसे रामे ते धाम सोडूनि द्यावे ।
सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥ ४४ ॥
जयाचेनि संगे समाधान भंगे ।
अहंता अकस्मात येउनि लागे ॥
तये संगतीची जनीं कोण गोडी ।
जिये संगतीने मती राम सोडी ॥ ४५ ॥
मना जे घडी राघवेवीण गेली ।
जनीं आपुली ते तुवा हानि केली ॥
रघूनायकावीण तो शीण आहे ।
जनीं दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥ ४६ ॥
मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे ।
जनीं जाणता मुक्त होऊनि राहे ॥
गुणी प्रीति राखे क्रमूं साधनाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७ ॥
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामे वदे सत्य साचा ॥
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८ ॥
सदा बोलण्यासारिखे चालताहे ।
अनेकी सदा एक देवासि पाहे ॥
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९ ॥
नसे अंतरी काम नानाविकारी ।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५० ॥
|| जय जय रघुवीर समर्थ ||
For more shlokas .....
मनाचे श्लोक १ - १०
मनाचे श्लोक ३१ - ४०
मनाचे श्लोक ५१ - ६०
Comments
Post a Comment