उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प ९
उपनिषदातील संकल्पना ~ प्राण
=====================
उपनिषदे मनुष्य जीवनाला सर्वांगाने परिपूर्ण करीत जाणारी ज्ञानाची सरिता आहे. ईश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा पंचमहाभूते आणि तीन गुण यांच्या साह्याने सर्व प्रकृती, जीव आणि मनुष्य घडविले. परंतु ते जीव हे अचल किंवा स्थिर होते त्यांना गतिशिल करण्यासाठी ईश्वराने त्यात प्राण रूपाने त्यात प्रतिष्ठापना केली.
प्राण हा शब्द उपनिषदांमध्ये तीन मुख्य अर्थाने वापरलेला आहे. जो माणसाच्या मेंदू तून (टाळू) शरीर मध्ये प्रवेश करतो ती ऊर्जा, जीवन रुपी शक्ती म्हणजेच मुख्य प्राण होय. ह्या मुख्य प्राणास आपण आत्मा किंवा आत्मतत्त्व असे म्हणतो. आत्मा ह्या शब्दाचा अर्थ खूप सुंदर आहे आत्मा म्हणजे "अतति इति आत्मा" म्हणजे जो सर्वत्र व्यापून राहतो तो आत्मा होय.
आत्मा रहातो कुठे? आत्म्याचे शेजघर म्हणजे हृद्य आहे त्याची विचार करण्याची जागा म्हणजे मेंदू, त्याचे मुख्य ठिकाण म्हणजे आज्ञाचक्र म्हणजे दोन भुवयामधील जागा होय.
जेव्हा मनुष्याला हा देह म्हणजेच मी आहे असे वाटू लागते तेव्हा तो बनतो गौण प्राण म्हणजे जीव होय. हा प्राण शरीरात आहे याची खूण म्हणजे आपला श्वास होय. या श्वास रुपी प्राणास म्हणतात स्थूल प्राण. श्वास चालू आहे म्हणजे माणूस जिवंत आहे. जी चेतना,ऊर्जा, शक्ति जीवांच्या मध्ये आहे जी सर्वत्र प्राण रूपाने व्यापून आहे. शरीरातील प्रत्येक पेशी मध्ये प्राणाचा संचार आहे असे आधुनिक पेशी विज्ञान तज्ञ सुद्धा मान्य करतात.
त्यामुळे प्राण हा शब्द कोणत्या संदर्भात आला आहे त्या अर्थाने समजावून घेणे खूप गरजेचे आहे. प्राण म्हणजे फक्त श्वसन क्रिया किंवा श्वास नाही तर त्यास मुख्य प्राण, गौण प्राण व स्थूल प्राण भिन्न भिन्न अर्थाने तो समजावून घेतला पाहिजे.
प्राण सर्वात मोठी शक्ति आहे ती आपल्या जीवनात सर्व शक्ती प्रदान करते ती शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून केला जातो तो प्राणायाम होय. ती फक्त श्वासंची हालचाल नाही तर आपली, आपल्या सर्व विश्वाची ऊर्जा आहे , जी शक्ती सर्वत्र व्यापून आहे म्हणूनच आत्मतत्त्व हे सर्वव्यापी आहे.
पुढील लेखात आपण स्थूल प्राण त्याचे पाच मुख्य प्रकार प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि पाच उपप्रकार समजावून घेऊ
श्रीराम जयराम जय जय राम !!
सुंदर अभंग
चाले हे शरीर कोणाचिया सत्ते ।
कोण बोलविता हरिविण ॥ १॥
देखवी ऐकवी एक नारायण ।
तयाचे भजन चुको नयें ॥ २॥
मानसाची देव चालवी अहंता ।
मीचि येक कर्ता म्हणूनिया ॥ ३॥
वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता ।
राहिली अहंता मग कोठे ॥ ४॥
तुका म्हणे विठो भरला सबाह्य ।
उणें काय आहे चराचरीं ॥ ५॥
संत तुकाराम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment