उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प ४ : Upanishad Part 4

 उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प ४


उपनिषदातील संकल्पना ~ माया आणि ब्रह्म

============================


आपण उपनिषदांचा अभ्यास हा समृध्द आणि आनंदी जीवन जगण्यासाठी करावा हे आपण मागील लेखातून पाहिले. तसेच उपनिषदे कोणकोणती ते पाहिले उपनिषदांचा अभ्यास सुरू करण्या आधी त्यातील काही संकल्पना आपण समजावून घेऊ म्हणजे मनुष्य, जगत आणि ईश्वर आणि त्यातील परस्पर संबंध लक्षात यायला मदत होईल. 


बऱ्याच वेळा अनेकांना प्रश्न पडतो की मनुष्य आणि जगत समजून घेणे तर्कदृष्टया पटते कारण ते दृश्य आहे. परंतु ईश्वर का समजावून घायचा आणि त्याचा परस्पर संबंध समजल्याने माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय फरक पडणार आहे? आणि कसा?  प्रश्न अगदी दररोजच्या जगण्यातला आणि  बरोबर आहे. तर चला या प्रश्नाची उत्तरे शोधून काढूयात. हे प्रश्न जसे आपल्याला पडले तसेच ते हजारो वर्षापुर्वी अनेक ऋषींना देखील पडले असतीलच. 


आपण पहिल्या लेखात पाहिले की मनुष्याची मूळ इच्छा ही नेहमी आनंदात जगण्याची असते. मग सुख आणि दुःख म्हणजे काय? माणसाच्या मनामध्ये अनेक संक्लप किंवा विचार येत असतात. त्यामध्ये मना प्रमाणे घटना आयुष्यात घडल्या तर त्याला आपण सुख म्हणतो आणि मनाविरुद्ध घडल्या तर दुःख झाले असे आपण म्हणतो. 


 माणसाचे मन हे विचार (thoughts), भावना ( emotions) आणि वर्तणूक (behaviour) या समभुज त्रिकोण मध्ये काम करते. जशा भावना उमटत जातात तसे विचार येतात, जसे विचार येतात तशी आपण वर्तणूक करतो आणि जशी वर्तणूक (त्यालाच आपण कर्म म्हणतो) तसे परिणाम दिसू लागतात हे सारखे सुरू असते.  मन आहे पण आपल्याला ते दाखविता येत नाही. मनातील संकल्पा प्रमाणे ज्या गोष्टी आपण उभ्या करतो त्याच आपल्या आयुष्यात होत जातात त्यातून तयार होते ते दृश्य जग. उदाहरण आपण मनामध्ये संकल्प करतो आपण परदेशी जाऊ तसे विचार आणि मग वर्तणूक म्हणजे प्रयत्न आपण करू लागतो. नोकरी किंवा पुढील शिक्षण साठी आपण परदेशी दाखल होतो. मग त्या मागे कोणती अदृश्य शक्ती काम करते ज्याचा परिणाम आपल्याला दिसतो परंतु ती दाखविता येत नाही. दृश्य म्हणजे आपल्या भोवती आणि विश्वात जे जे घडते आहे ते सर्व होय.


अनंत जीवांना अव्यक्तातून व्यक्त अवस्थेत आणणारी आणि दृश्या मध्ये गुंतवून ठेवणारी जी विलक्षण शक्ती तिला माया असे म्हणतात.


कोणतीही शक्ती स्वतंत्रपणें राहू शकत नाही. तिला तुल्यबळ असे अधिष्ठान लागते. ईश्वर हे मायेचे अधिष्ठान आहे. माणसाची इंद्रिये, मन आणि बुद्धी हा  दृश्यचाच  भाग आहेत दृश्यपणें प्रकट होणे हा मायेचं स्वभाव आहे. मायेचा पसारा अनंत आहे त्यामुळे तर्काने तिचे खरे स्वरूप  आकलन होणार नाही. दृश्य जगत हे अशाश्वत आणि अनेकरस आहे. मायेचा प्रभाव जीवांतील अविद्येमुळे म्हणजे आपण जे विश्व आपल्या भोवती तयार करतो तो मायेचा मना वाटे चालेला खेळ आहे. माया ही काळाच्या अधीन आहे.  जसे आपण एखाद्या घनदाट जंगलात  राहत असू तर त्या बाहेर काही आहे हेच आपण विसरतो जंगलाचं सर्वस्व समजायला लागतो. आपण आपले कुटुंब नोकरी व्यवसाय मुले दररोजची दिनचर्या या बाहेर आपण कधी पहातच नाही. या बाहेर विश्व असते का? हो असतें त्या विश्वाच्या बाहेर काय आहे? किंवा ते कशात सामावलेले आहे? ते कोण नियंत्रित करतो किंवा चालवतो? ते कसे आणि काय आहे?? ह्या प्रश्नांची उत्तरे उपनिषदांत शोधली गेली आहेत. ते उत्तर म्हणजे ब्रह्म होय. ब्रह्म नक्की काय आहे? 


ब्रह्म हे शाश्वत आणि एकसर आहे. ते अनंत आणि निर्विषेश आहे.  ब्रह्म कसे नाही हेच वर्णन वेद सांगत आले आहेत ते सूक्ष्म ही नाही स्थूल ही नाही ते कसे आहे हे संपूर्णता सांगता येत नाही. जगत हे ब्रह्मातून आले,त्यात राहिले व त्यातच ते जिरते. ब्रह्मच सर्व सृष्टीचा करता आहे. ब्रह्म अविनाशी आहे. ते उत्पन्न होत नाही किंवा नाश ही पावत नाही म्हणून अकाल आहे. ते जन्म मरण रहित आहे. ते भय रहित आहे. ते स्वयंप्रकाशी आहे.  असे वर्णन सतगुरू नानक करीत आहेत. सद्गुरूच्या प्रसादाने च अविद्ये रुपी मायेचा नाश होऊन भेद रहित ब्रह्म जाणता येते. असे ज्ञान देण्याचे सामर्थ्य फक्त सद्गुरू जवळ आहे. 


माया आणि ब्रह्म हे दोन्ही ज्ञान आणि विज्ञानाला धरुनच आहेत. ते अनुभवाच्या क्षेत्रात आणि जीवनात याची देही याची डोळा पाहता येतात. कोडे उलगडायला  सद्गुरु भेटायला हवेत. गुरु आणि सद्गुरु यात खूपच अंतर आहे. त्यामुळे ते जपून, शोधून, परिक्षून करावेत. हिरा आणि खडा वेगळा पाहता येण्यासाठी विवेक रुपी चक्षु आणि नाम रुपी साधन हवे. आपली तयारी झाली की सद्गुरूच आपल्याला भेटतातच!! असो...


पुढील भागात आपण माया आणि ब्रह्म यांचा परस्पर संबंध पाहू आणि जगत उत्पती कशी होते ते समजावून घेऊ.


|| श्रीराम जयराम जय जय राम ||


आषाढ कृष्ण द्वितीया शके १९४५ 


सुंदर अभंग - 

विश्वव्यापी माया ।

तिणें झाकुळिलें छाया ॥१॥

सत्य गेलें भोळ्यावारी ।

अविद्येची चाली थोरी ॥ध्रु.॥

आपुलेंचि मन ।

करवी आपणां बंधन ॥२॥

तुका म्हणे देवा ।

तुम्ही कोडीं हीं उगवा ॥३॥

         संत तुकाराम महाराज 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments