उपनिषद अभ्यास लेखमाला पुष्प २०
*उपनिषद संकल्पना - वेदान्ताचे रहस्य*
===============================
उपनिषदे ही आनंदमय आहेत याची प्रचिती दररोज साधकाला येत असते. उपनिषदे ही अनेक रहस्यांचा उलघडा करतात तसेच ती मुक्तीची द्वारे आहेत याची मला पदोपदी खात्री पटते. मधले अनेक विषय टाळून मी आजचा लेख लिहित आहे. कारण आनंद जसा उफाळून यावा तसे हे रहस्य मी कधी शब्दांकित करतो असे मला झाले आहे. त्याबद्दल मी विषय सुरवात करण्याआधीच आपली माफी मागतो.
ज्याला आत्मदर्शन झाले आहे अशा व्यक्तींना आपण संत म्हणतो. प्रथम आपल्याला आत्मा या विषयी अढळ अशी श्रध्दा असावी लागते म्हणजे ते जाणून घेण्यासाठी साधक प्रयत्न करतो. म्हणून संतांवर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण वाटचाल करू आपल्यास नक्की आपले गंतव्य म्हणजे आत्मज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांची संतावर श्रद्धा नाही ते नास्तिक होय त्यांना आत्मदर्शन होणे कठीण आहे.
माणसाचे मोठे पण त्याच्या कृतीवर नसून त्या कृतीमागे असणाऱ्या वासानेवर अवलंबून आहे. जीवनातील महत्वकांक्षा टाका असे आपल्याला वेदान्त कधीच सांगत नाही. परंतु ती महत्वकांक्षा ज्या स्वार्थावर उभी आहे ती समाजात संघर्ष निर्माण करते. उदाहरण द्यायचे झाले तर नेपोलियन त्याचे राज्य हेतू स्वार्थ पछाडलेले होते त्यामुळे त्याचा नाश झाला उलट आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य हेतू ही परमेश्वर इच्छा आणि रामराज्य ही होती त्यामुळे ते आदरणीय आहेत.
कर्ते पणाचा अभिमान आणि ममत्व बुध्दी या दोन तोंडाने वासना व्यक्त होते. जीवाची बुध्दी,मन, प्राण, इंद्रिय हे सर्व आत्म सत्तेने कार्यरत असते पण आपण हे सर्व विसरतो. मी अमुक केले मी अमुक करणार नाही हा कर्तुत्व मद तो धारण करतो. त्यामुळे त्याला दुःख आणि चिंता भोगाव्या लागतात.
तसेच ज्या वस्तूंवर आपली खरी मालकी नाही त्यांच्या बद्दल ममता, माझे पण, आसक्ती ह्या दुःखाला कारण होतात. त्याला उपनिषद अंतकरणाच्या गाठी ज्या त्याला आकुंचित करतो असे सांगतात. वस्तूंवर ममत्व जडले की जीवाचे तोंड हे जगाकडे होते. जीव त्याची आस ठेवतो आणि त्याचा दास होतो. दास्यत्व हे बंधन आहे.
व्यक्ती, वस्तून ममत्व जो पर्यंत आहेत तो पर्यंत आत्मज्ञान कसे होणार?
समर्थ रामदास आपल्या दासबोधात सांगतात
देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी ।
सर्व अर्पावें सेवटीं । प्राण तोहि वेचावा ॥ ८ ॥
दासबोध सख्यभक्ती निरूपण
कर्ते पणाचा अभिमान मारण्यास जीवनाचे कर्तुत्व भगवंताकडे सोपवून निमित्त मात्र उरणे हाच एक मार्ग आहे. याचा अर्थ कर्म किंवा प्रयत्न सोडावे असा नाही तर त्या मागील स्वार्थ बुध्दी सुटली पाहिजे. कारण प्रयत्न करण्याची बुध्दी सुद्धा आपल्याला आपली श्रद्धा आणि परमेश्र्वरच देत असतो.
ममत्व मारण्यास आपली मालकी भगवंताला आपखुषींने देणे हा फार सोयीचं उपाय आहे. अशा दास्यत्व भावाने वागणारा मनुष्य आपली व्यावहारिक कर्तव्य सुध्दा उत्तम पार पाडतो.जे फळ मालक देईल त्यातच समाधान भगवंताचा दास मानेल यात शंका नाही.
वासनानाश साठी कर्तेपणाचा अभिमान आणि ममत्व सुटले की वासना क्षीण होऊन लयास पावेल आणि ती लयास् पावली की शुद्ध चित्त बुध्दी उत्पन्न होईल त्याच विवेकी बुध्दीला आत्मज्ञान घडेल. हेच ते वेदान्त चे रहस्य होय.
श्रीराम जय राम जय जय राम !!
सुंदर अभंग -
तेंही नव्हे जें करितां कांहीं ।
ध्यातां ध्यायीं तेंही नव्हे ॥१॥
तें ही नव्हे जें जाणवी जना ।
वाटे मना तेंही नव्हे ॥ध्रु.॥
त्रास मानिजे कांटाळा ।
अशुभ वाचाळा तेंही नव्हे ॥२॥
तेंही नव्हे जें भोंवतें भोंवे ।
नागवें धांवे तेंही नव्हे ॥३॥
तुका म्हणे एकचि आहे ।
सहजिं पाहें सहज ॥४॥
संत तुकाराम
*अर्थ*
तू जे काही करशील ती भक्ती नाही आणि ज्याचे ध्यान करत आहेस त्यातही भक्ती नाही कारण भक्ती करशील तर त्यात कर्तेपणा आणि ध्यान करशील तर त्यामध्ये ध्याता हा अहंकार उत्पन्न होतो.लोकांना ब्रम्हज्ञान सांगणे हि भक्ती नाही आणि मानाने तूला ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रमाणे भक्ती करणे ही भक्ती खरी नाही.लोकांना त्रासून कांटाळणे व अशुभ बडबड करणे ही भक्ती नाही.पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे किंवा नागवे फिरणे यालाही भक्ती म्हणत नाही.तुकाराम महाराज म्हणतात भक्तीचे एकच लक्षण आहे ते म्हणजे तू कोणतेही कर्म कर पण त्या कर्माकडे तू अभिमानाने नाही तर सहजतेने लक्ष देऊन पहा.
https://youtu.be/iROcdUd9Dz8?si=YwF2Wn2Tj_CZ0Oit
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*उपनिषद अभ्यास लेखमाला पुष्प २१*
*उपनिषद संकल्पना - वासनेची अदृश्य सृष्टी: लोक*
===============================
उपनिषदे ही अनेक रहस्यांचा उलघडा करतात तसेच ती मुक्तीची द्वारे आहेत याची मला पदोपदी खात्री पटते. असे मी मागील लेखात सांगितले. सृष्टीची रचना ही अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यात एका टोकाला अत्यंत सूक्ष्म असा आत्मा आहे तर दुसऱ्या टोकाला पंच महाभूत पासून बनलेले विशाल असे जड विश्व आहे.
अशा ह्या दोन टोकांमध्ये अत्यंत मोठी अशी सूक्ष्म सृष्टी आहे. ह्या सूक्ष्म सृष्टी चे वासना हे मूलद्रव्य आहे जे आत्म्याच्या छायेत राहते. वासना ही शक्तीमय आहे म्हणून हे सर्व विश्व हालचाल करते. ती सर्व ठिकाणी सारख्याच प्रमाणत पसरलेली नाही. ज्या ठिकाणी ती अत्यंत विरळ आहे त्या ठिकाणी आत्म्याचा प्रकाश पडतो त्यालाच आपण देहबुद्धी सुटणे म्हणजे वासना विरळ होणे असे म्हणतो.
काही ठिकाणी तो अत्यंत दाट आहे. उपनिषदे आणि ज्ञानी लोकांचे ग्रंथ त्याला वासनेच्या थराला *लोक* असे म्हणतात. म्हणजे पुण्य लोकात वासना अत्यंत विरळ आणि शुद्ध असते तिथे भगवंताचे प्रेम अधिक असते.
पाप लोकात वासना अत्यंत दाट आणि अशुद्ध असते त्या वातावरणात स्वार्थ पूर्ण भरलेला असतो. अदृश्य सृष्टी लोक असे ऐकमेकांवर असे मजले प्रमाणे नसतात.
जशी निरनिराळे माणसे एकाच जमिनीवर राहतात त्या प्रमाणे वासनेच्या अदृश्य विश्वात सर्व योग्यतेचे जीव एकच ठिकाणी राहतात फक्त सारखी आवड असलेले लोक एका ठिकाणी जमतात.
त्यामुळे वासनामय अदृश्य विश्वात वासना शुद्ध करण्याची संधी नसते ती संधी या जगात जिवंतपणी अत्यंत विवेकाने वापरून ती भगवंताकडे वळविणे गरजेचे असते त्याला आपण मनुष्य लोक असे म्हणतो.
मरणोत्तर अवस्थे मध्ये अदृश्य असे वासनामय देह असतात (ब्रह्मराक्षस इत्यादी शब्दांनी सुचविलेलले) त्यांचे पारिभाषिक अदृश्य सृष्टि अस्तित्वात असते.
मरणकाळी जी वासना असते ती प्रधान वासना बनून तिचे कवच जीवा भोवती बनते. त्या वासने नुसार माणूस सुख आणि दुःख भोगतो. त्या साठी मरण काळी आपली वासना ह्या भगवंताकडे वळलेल्या असण्या साठी प्रगतिशील मनुष्य आयुष्य भर अखंड उपासना करीत असतो. तेच सातत्य शेवटी आपल्याला परमेश्वराचे चिंतन घडविते.
*अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।*
*यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥*
भगवत गीता अध्याय ८-५
अर्थ : जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही.
तेच आपल्याल भगवंत गीतेमधून शिकवीत आहेत.
माऊली याचे अत्यंत सुंदर वर्णन आपल्या ओवी मधून करितात.
*ज्ञानेश्वरी अध्याय ८*
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे ।
तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥
आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे ।
म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥
*अर्थ*
याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते. आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो, असे आहे म्हणूण तू नेहेमी माझेच स्मरण कर.
श्रीराम जय राम जय जय राम !!
*सुंदर अभंग*
जया जे वासना तया ती भावना ।
होतसे जाणा आदि अंतीं ॥१॥
कामाचे विलग आवरावें चित्त ।
क्रोधाचा तो ऊत शांतवोनी ॥२॥
ममताही माया दंभ अहंकार ।
आवरावे साचार शांति सुखें ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरावा संग ।
तरीच पांडुरंग हाता लागे ॥४॥
संत चोखामेळा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment