उपनिषद अभ्यास लेखमाला पुष्प १९ : Upanishad Part 19

 उपनिषद अभ्यास लेखमाला पुष्प १९


*उपनिषद संकल्पना - व्रत, प्रार्थना, उपासना*

===============================


उपनिषदे नुसते मन म्हणजे काय हे सांगून थांबत नाहीत तर ते बलवान कसे करावे आणि त्याची साधने समजावून सांगताना आपणास व्रत म्हणजे काय हे सुध्दा व्यवस्थित समजावून देतात. आपण मागील लेखात पाहिले की जी निश्चयाने सतत करावयाची कृती - विधी किंवा निषेधार्थ गोष्ट जीचा कधीही भंग होऊ द्यायचा नाही अशा कृतीला आपण *व्रत* असे म्हणतो.  जीवनात जी अनेक व्रते मानवी जीवन समृध्द करतात त्यातील अन्न आणि त्यासंबंधीचे काही व्रत आपण मागील लेखात अभ्यासले आता अजून थोडा सखोल अभ्यास करूयात.


न कंचन वसतौ प्रत्याचक्षीत! तद्व्रतम्!

तस्मात् यया कया च विधया  बहृन्न प्राप्नुयात् 

                                       तैत्तिरिय (३.१०)


 निवासासाठी, आलेल्या कोणालाही नाकारू नये त्यास अन्न अंथरूण पांघरूण द्यावे त्यासाठी कोणत्याही प्रकारे अन्न वस्त्र पुष्कळ संग्रह करावा हे व्रत म्हणून आचरावे. 


  महामना: स्यात् ! तद् व्रतम् !! 

                    छान्दोग्य (२.११)


मन मोठे (उदार, प्रेमळ आणि सश्रद्ध) ठेवावे हे व्रत म्हणून पाळावे. 


छान्दोग्य उपनिषद आपल्या निसर्गाविषयी आदर जपण्यासाठी अनेक व्रत सांगतो जसे की तपन्तम् न निन्देत! तद् व्रतम्  म्हणजे तळपत्या सूर्याची सुद्धा निंदा करू नये. वर्षन्त न निन्देत् , ऋतून न  निन्देत्, पशून् न निन्देत् तद् व्रतम् छान्दोग्य (२.१५, २.१६, २.१८) असे अनेक निसर्गाचा आदर करणारी व्रत आपल्याला सांगत आहेत. 


मन बलवान करण्याचे दुसरे साधन म्हणजे प्रार्थना होय. सर्वच उपनिषद आपल्याल अनेक सुंदर शांती मंत्र शिकवतात आपण ते सर्व अभ्यासाच्या योगात पाहणार आहोत.  प्रार्थना म्हणजे याचना किंवा माणसाने सर्व स्व पराक्रमाने आपले ध्येय साधावे  देवाकडे सुद्धा याचना करू नये असे सांगणारे चुकीची साहित्य आजकाल सुकाळ झाला आहे त्याचे कारण या विश्वाचा कर्ता हा परमेश्वर आहे ही लोप पावत जाणारी भावना होय. माणूस किती ही महान बनला तरी त्या अनादी अनंत परमेश्वर पुढे तो नगण्यच आहे. प्रार्थना आपल्याला नम्रता शिकविते. आत्मज्ञान फक्त प्रयत्न करून साध्य होणार नाही किंवा नुसत्या अध्ययन करून विवरण प्रवचन करून ते मिळत नाही. ज्याला आत्मदेव वरतो (आत्मीय म्हणून स्वीकारतो) त्यालाच आत्मलाभ होतो. 


अनेक जन्मांच्या विषय वासनानीं मलिन झालेले चित्त, स्वधर्माचे आचरण, व्रत, प्रार्थना उपासना करून शुद्ध निर्मल झाले तरच आत्मदेव अनुग्रह करतो. म्हणून रोज सकाळ संध्याकाळ व्यक्तिशः किंवा सर्वांनी एकत्र प्रार्थना तळमळीने,आर्ततेने, श्रध्देने केली पाहिजे.


आता उपासना म्हणजे काय हे थोडक्यात पाहू. उपास्यशक्तीच्या जवळ (उप) आसनाची-बसण्याची स्थिर होण्याची युक्ती म्हणजे *उपासना* होय. अर्थात हे शरीराने नसून मनाने देवा जवळ बसणे होय. मना शिवाय इंद्रिये काम करीत नाही इंद्रिय शिवाय स्थूल जड शरीर काम करीत नाही म्हणून उपासना ही मानसिक क्रिया आहे. उपनिषदे बहिरंग आणि अंतररंग उपासना दोन्ही सांगत आहेत. परंतु हे समजणे खूप गरजेचे आहे की


 तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते ! 

                         केन (१.४ ते १.८) 


तेच तू ब्रह्म असे जाणं ज्याची उपासना करतात ते ब्रह्म नव्हे.  उपासनेनी ज्ञान होण्याची पात्रता निर्माण होते परंतु ज्ञेय असलेले ब्रह्म हा उपासनेचा विषय होऊ शकत नाही. 


आत्मज्ञान प्राप्ती साठी मन बलवान असणे गरजेचे आहे ते आपल्यात पात्रता निर्माण करते त्या साठी आपल्याला व्रत, प्रार्थना आणि उपासना करणे गरजेचे असतात. परंतु ते म्हणजे ब्रह्म किंवा आत्मज्ञान नव्हे तर आत्मज्ञान प्राप्ती साठी पात्रता यावी म्हणून ती साधने आहेत. 


श्रीराम जय राम जय जय राम !!


सर्वात्मका सर्वेश्वरा

गंगाधरा शिवसुंदरा

जे जे जगी जगते तया

माझे म्हणा करुणाकरा

आदित्य या तिमिरात व्हा

ऋग्वेद या हृदयात व्हा

सुजनत्व द्या, द्या आर्यता

अनुदारिता दुरिता हरा!!

                  कुसुमाग्रज 


https://youtu.be/L36_XB7x3IU?si=E7tUSFBCwSy-9lDe


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



Comments