उपनिषद अभ्यास लेखमाला पुष्प १८ : Upanidhad Part 18

 *उपनिषद अभ्यास लेखमाला पुष्प १८*


*उपनिषद संकल्पना - मनाच्या बलाची साधने*

===============================


आपले महान ऋषि उपनिषदात अत्यंत सूक्ष्म विचार करतात. मागील लेखात आपण अंत:करण चतुष्टय म्हणजे मन, बुध्दी, चित्त, आणि अहंकार म्हणजे काय हे आपण समजावून घेतले. अज्ञात गोष्टींचे ज्ञान करून घेण्याच्या जिज्ञासू वृत्तीने जेव्हा अंत: करण त्याचा शोध घेत असते तेव्हा त्याला मन असे म्हणतात. 


मनानेच आपल्या मध्ये प्रिय, द्वेष्य, त्याज्य आणि ग्राह्य हे नानाविध वस्तुमात्रा बद्दल भाव निर्माण होतात. स्वप्नात तर आपले मन अद्भुत सृष्टी निर्माण करते. अशा या बलवान परंतु चंचल मनाला अंतर्मुख बनविण्यासाठी खूप सारी शक्ती किंवा बल संपादन करावे लागते. *हे बल आपण व्रते, प्रार्थना आणि उपासना या साधनांनी मिळवावे लागते* असे उपनिषदे आपल्याला सांगत आहेत.


जी निश्चयाने सतत करावयाची कृती - विधी किंवा निषेधार्थ गोष्ट जीचा कधीही भंग होऊ द्यायचा नाही अशा कृतीला आपण *व्रत*असे म्हणतो.  जीवनात कोणते ही व्रत हे फार महत्त्वाचे गोष्ट असते. कोणतेही व्रत अखंडपणे चालू ठेवायचे म्हणजे त्याविषयी आपल्याला निष्ठा, धैर्य, करारीपणा, हनिलाभ, प्रसंगी निंदा सुद्धा सहन करण्याच्या तयारी हे गुण अंगी असावे लागतात. म्हणून व्रतांची फलश्रुती सांगितले जाते की जेणे करून फलाच्या अपेक्षणे तरी व्रत अचारले जावें.


अन्नम न निन्द्यात् तद् व्रतम् !

                तैत्तिरिय (३!७) 


अन्नाची निंदा करू नये हे व्रत होय. आपण सर्व उद्योग करून अन्न मिळवतो, सुगरण ते कष्ट आणि पाक कौशल्य वापरून ते तयार करते म्हणून त्यास नावे न ठेवता समाधानाने, आनंदाने अन्न भक्षण करावे. अन्नमयं सौम्य मन: म्हणजे मन हे अन्नमय आहे असे आपल्याला छान्दोग्य उपनिषद सांगते.  


 अन्न बहु कुर्वीत तद्व्रतम् !!

                  तैत्तिरिय उपनिषद (३!९)


अन्न पुष्कळ संपादित करावे हे व्रत मानले जात. म्हणून 

देश हा नेहमी अन्नधान्य साठी स्वावलंबी असावा. सुवर्ण भूमी भारतात मध्ये पूर्वी अन्न विक्री हे पाप मानले जात होते. आत्ता पावलापावलावर उपहारगृहे दिसत आहेत. 'हॉटेल संस्कृतीने' भारतीयत्वालाच हद्दपार केले. हॉटेल ही आधुनिक बकासुर आहेत जी आपल्याकडे रोज गाडाभर म्हणजे ट्रक भरून अन्न लागणारे उपहारगृहाचे आकडे शेकड्याने आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या ताटातील धान्य किंवा अन्न लुबाडले जाऊन त्याची भरमसाठ चोरी, साठा म्हणजे परिग्रह केला जातो आहे. बहुतांशी लोक चैन किंवा जिव्हालौल्य म्हणून हॉटेलात जातात.  उपहारगृह संस्कृती मुळे अनेक रोग, आजार माणसाला जोडले आहेत.  ज्या दिवसापासून आपण उपहारगृहात खाणे बंद करतो त्या पासून आपले आरोग्य बिघडणे थांबते आणि मनाची शक्ती वाढीस लागते. साधकाने कधी स्वतः किंवा माता,भगिनी, पत्नी यांनी बनविलेले , स्वगृही किंवा सद्गुरु स्थानी सोडून दुसरीकडे  म्हणजे उपहारगृहात अन्न भक्षण करू नये.


पूर्वी आपल्या कडे अतिथी धर्माचे बंधन होते फक्त कुटुंब पुरते अन्न शिजविणे हा अधर्म मानला जात असे किती ही पाहुणे आले तरी त्यांना जेवून पाठविले जात असे त्यामुळे अतिथी ची वाट पाहायली जात होती. म्हणून भारतात कोणी उपाशी झोपत नसे.भारतात सुभिक्ष चे दिवस दिसोत ही आशा करूयात.


गीता आपल्याला सांगते की सात्विक अन्न नेहमी भक्षण करावे, हे मी स्व अनुभवाने परिणाम भोगून अंतत: शिकलो आहे. आरोग्याची अपरिमित हानी झाल्यावर नंतर चुका सुधारणे कठीण असते. त्यामुळे ज्या क्षणा पासून आपल्याला आपली चूक लक्षात येते त्याच दिवसापासून ती सुधारणे गरजेचे असते. तीच आपल्या सत संक्लपाची सुरवात असते. 


आपण पुढील लेखात अजून व्रत, प्रार्थना आणि उपासना यांचं अधिक अभ्यास करूयात. 


श्री राम जय राम जय जय राम !!


*सुंदर अभंग - संत तुकाराम*

 

आम्ही पतित म्हणोनि तुज आलों शरण । 

करितों चिंतन दिवस रात्रीं ।

नाहीं तरी मज काय होती चाड । 

धरावया भीड तुज चित्तीं ॥१॥

आम्हां न तारावें तुम्ही काय करावें । 

सांगीजोजी भावें नारायणा ॥ध्रु.॥

अन्याय कोणाचा अंगीकार करणें । 

तया हातीं देणें लाज तेचि ।

काय ते शूरत्व मिरवूनि बोलणें ।

 जनामाजी दावणें बळरया ॥२॥

पोह्या अन्नछत्र घालूनियां घरीं । 

दंडितो बाहेरी आलियासी ।

नव्हे कीर्ती कांहीं न मानेचि लोकां । 

काय विटंबणा जैसी तैसी ॥३॥

प्रत्यक्षासी काय द्यावें गा प्रमाण । 

पाहातां दर्पण साक्ष काई ।

तुका म्हणे तरी आम्हां का न कळे ।

 तरलों किंवा आम्ही नाहीं ॥४॥


*अर्थ*

देवा आम्ही पतित आहोत म्हणूनच तुला शरण आलो आहोत त्यामुळे आम्ही तुझे चिंतन रात्रंदिवस करीत आहोत. देवा जर आम्ही पतीत नसतो तर तुझी भिड आम्ही चित्तात का धरली असती? देवा हे नारायणा तुम्ही जर आमचा उद्धार करणार नाही तर मग तुम्ही आमचे काय करणार ते खरे सांगा. ज्याने आमचा अंगीकार करून दुसऱ्याच्या हाती आम्हाला दिले अशी ज्याची चूक आहे, त्याची ही लाजिरवाणी चूक त्यानेच स्वीकारावी. देवा अहो तुमची दीनानाथ ,पतितपावन म्हणून ब्रिदे आहे, केवळ त्याचेच तुम्ही भूषण जगामध्ये मिरवता शुर व्यक्तीने केव्हा ही शुरत्वाच्या गप्पा मारू नये त्याचे भुषण मिरवून उगाच बरळु नये. घराबाहेर पाणपोया अन्नछत्र घालतो आणि बाहेर आलेल्या भुकेल्यांना तहानलेल्यांना परत हाकलूनही लावतो याला काय अर्थ आहे काय? जर असे त्याने केले तर त्याची कीर्ती जगामध्ये होणार नाहीये लोकांना तो पटायचा नाही आणि त्याने असे करणे म्हणजे ती एक प्रकारची विटंबना नाही काय? 

                                   

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments