उपनिषद अभ्यास लेखमाला पुष्प १७ : Upanishad Part 17

 उपनिषद अभ्यास लेखमाला पुष्प १७ 


*उपनिषद संकल्पना - अंत:करण चतुष्टय*

======================


आपले महान ऋषि उपनिषदात अत्यंत सूक्ष्म विचार करतात कारण मानवी जीवन हे आनंद रूप आहे. हे समजावून घेताना आपण मागील लेखात इंद्रिये म्हणजे नक्की काय? मन म्हणजे नक्की काय? ते कसे काम करते हे आपण थोडक्यात पाहिले. ही बाह्य ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये त्यांचे विषय कसे काम करतात हे आपण पाहिले. त्याचा व्यापार आपल्या आत मध्ये कसा चालतो हे अधिक खोलात जाऊन समजावून घेणे रोचक ठरेल.


आपली ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये ह्यांच्या व्यापाऱ्यांचे नियंत्रण करणारे जे अंतरिंद्रिय त्यास *अंत:करणं* असे म्हणतात. त्यातील करण या शब्दाचा अर्थ म्हणजे साधन होय. म्हणजे थोडक्यात आपल्या आतली साधने होत. 


हा देह मी आहे देहादिकांच्या द्वारा घडणाऱ्या कर्मांचा आणि भोगांचा कर्ता आणि भोक्ता मीच आहे अशी भावना जेव्हा अंत: करणात उदित होते तेव्हा त्या वृत्तीला *अहंकार* असे म्हणतात. वृत्ति म्हणजे सोप्या शब्दात मनातील तरंग होय. 


हे अमुक आहे असे निश्चित ज्ञान ग्रहण करणे व अशी अनेक निश्चित ज्ञाने आपल्या ठिकाणी साठवून ठेवणे हे बुध्दी चे कार्य होय. सांख्य मतानुसार 

          बुद्धे: लक्षणम अध्यवसायः !

म्हणजे निश्चयात्मक ज्ञानस *बुद्धि* असे म्हणतात.

 परंतु हे निश्चित ज्ञान तत्वतः अचूक किंवा निर्दोष असेलच असे नाही.  परंतु जो पर्यंत त्यातील दोष किंवा चूक जोपर्यंत अज्ञात असते तो पर्यंत तो निर्दोष आणि अचूक मानून बुध्दीचे व्यापार चालू असतात. त्यामुळे बुध्दी सदोष असू शकते. 


जेव्हा ते ज्ञान यथार्थ पणे किंवा प्रकर्षाने म्हणजे विशेष प्रकारे ज्ञान जिला होते ती *प्रज्ञा* होय संयमांचा जय झाला म्हणजे प्रज्ञेचा उदय होतो.


या अज्ञात गोष्टींचे ज्ञान करून घेण्याच्या जिज्ञासू वृत्तीने जेव्हा अंत: करण त्याचा शोध घेत असते तेव्हा त्याला *मन* असे म्हणतात. 


बुद्धीला ज्ञात झालेली गोष्ट पुन्हा वाटेल तेव्हा स्मरावी म्हणून त्या ज्ञात गोष्टींचे वारंवार अनुसंधान करणारे ते *चित्त* होय. 


अमुक गोष्ट कशी असावी अशा विचाराने अनेक युक्त्या प्रयुक्त्या व शंका समाधान ह्यांच्या साह्याने जेव्हा ती अज्ञात गोष्ट समजावून घेतली जाते त्या व्यापाराला *मनन* असे म्हणतात.


मननाने एकदा कोणती गोष्ट त्या वेळी नि: संदेह समजली म्हणजे मग ती नीट स्मरणात राहावी म्हणून पुन्हा त्या गोष्टींचे अनुसंधान करणे म्हणजे *चिंतन* करणे होय आणि त्यातून पुन्हा त्या विषयी संदेह उत्पन्न होऊ नये म्हणून केले जाते ते चिंतन होय.


अवघड गणित सोडविताना आपण जो मनात प्रयत्न करतो ते मनन होय चिंतन नाही. सद्गुरु आशीर्वादाने आणि सतत केलेले नामस्मरणाने आपल्याला जे आनंद स्वरूप आत्मज्ञान होते जे ब्रह्मानुसंधान घडते ते चिंतन होय.


इन्द्रियेभ्यः परा ह्यर्था अर्थेभ्यश्च परं मनः ।

मनसस्तु परा बुद्धिर्बुद्धेरात्मा महान्परः ॥ १०॥

                               कठोपनिषद (१.३.१०)

*अर्थ*

उपनिषदे आपल्याला हे सांगता आहेत की इंद्रिया हून विषय (शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध)  सूक्ष्म आहेत. विषय हून मन सूक्ष्म आहे. मनाहून बुध्दी सूक्ष्म आहे. बुध्दी पेक्षा आत्मा हा अधिक सूक्ष्म आहे.


व्यवहारामध्ये पुष्कळ ग्रंथ वाचून खूप शब्द ज्ञान मिळवून बुध्दी मध्ये ज्ञान गोदमा सारखे ठासून भरणाऱ्या बुध्दीला अध्यात्मात महत्व नाही. माझे जीवन हे भगवंतासठी आहे असे निश्चितपणे समजणारी बुध्दीच खरी आत्मनिष्ठ आहे आणि जो भगवंताबदल जिज्ञासा बाळगून आहे त्याचे मनन, नामस्मरण नित्य करून त्याला जाणून घेण्याच्या,सर्व शंका समाधान करून सद्गुरुंना, संताना आणि ईश्वराला शरण जाणारा साधक त्या ईश्वराच्या अधिक जवळचा आणि बुद्धिमान आहे. 


 सर्व अंत: करणं मधील व्यापार, आपली ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये ही नेहमी ईश्वर नामस्मरणात, साधनें मध्ये, भक्ती मध्ये गुंतवावे असे आपल्याला संत नेहमी सांगत आहेत.


!! श्रीराम जय राम जय जय राम !!


सुंदर अभंग


चाले हें शरीर कोणाचिये सत्ते ।

कोण बोलविते हरीवीण ॥१॥

देखवी ऎकवी एक नारायण ।

तयाचें भजन चुको नको ॥२॥

मानसाची देव चालवी अहंता । 

मीचि एक कर्तां म्हणोनियां ॥३॥


वृक्षाचेंही पान हाले ज्याची सत्ता ।

राहिली अहंता मग कोठें ॥४॥

तुका म्हणे विठो भरला सबाहीं ।

तया उणें काहीं चराचरीं ॥५॥

             संत तुकाराम 


https://youtu.be/2TAbir3WKpo?si=sTYxhg2YALJRLZ_c


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments