*उपनिषद अभ्यास लेखमाला पुष्प १६*
*उपनिषद संकल्पना - इंद्रिय आणि मन*
===============================
उपनिषदे ही ज्ञानाची अथांग अशी सतत वाहणारी गंगा माता आहे. उपनिषदे खूप सुंदर प्रकारे आपल्याला विचार करायला शिकवतात. ज्या अनेक गोष्टी आपण दररोज पाहत असतो, वापरत असतो त्याचा खोलवर विचार, मनन आणि चिंतन आपल्याला उपनिषदे घडवितात. आपण मागच्या लेखात वासना म्हणजे काय त्याचा थोडक्यात अभ्यास केला.
वासना धारण कोण करतो? ती कशी काम करते? तिला सहायक कोण होते त्यासाठी आपल्याला इंद्रिय, मन बुध्दी मुळापासून काय आहे त्याचा परस्पर संबंध काय आहे हे समजायला हवे.
आत्मानँ रथितं विद्धि शरीरँ रथमेव तु ।
बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च ॥ ३॥
इन्द्रियाणि हयानाहुर्विषयाँ स्तेषु गोचरान् । आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः ॥ ४॥
कठोपनिषद १.३
अर्थ
आपले शरीर हा रथ असून, आत्मा हा रथाचा मालक आहे. बुध्दी ही सारथी आहे.मन हे लगाम आहे.
इंद्रिये हे घोडे असून विषय हा त्याचा मार्ग आहे तर आत्मा हा त्याचा भोक्ता आहे.
जेव्हा परमेश्वरा पासून सर्जनशक्ती जागृत झाली तिच्या पासून त्याने त्रिगुण (सत्व, रज, तम) आणि पंचमहाभूते निर्माण केली (आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी). त्याला निर्मितीचां कच्चा माल म्हणजे तत्वज्ञानात कारण असे म्हणतात.
पंच महाभूतांच्या सत्व अंशापासून अंत: करण बनते. अंत: करण म्हणजे मन, बुध्दी, अहंकार, आणि चित्त होय. या मध्ये करण म्हणजे साधन होय. त्यापासून जे दृश्य जग किंवा वस्तुमात्र बनले त्याला कार्य असे म्हणतात.
या अशुद्ध सत्व गुण मध्ये रजो गुण मिसळला की त्या पासून तयार होतात ती ज्ञानेंद्रिय (नाक, कान, डोळे, त्वचा, रसना). रजो गुण अंश पासून तयार होतात ती कर्मेद्रिय (हात, पाय, वाक्, गुद, उपस्थ) होत. तसेच शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध हे त्यांचे विषय होत.
तमोगुण अंशा पासून जे बनते तर रक्त मांस अस्थी रुपी शरीर होय.
इंद्रियांचे मधील ही ज्ञानेंद्रिय, कर्मेद्रिय आणि त्यांचे हे विषय होत. इंद्रिय स्वतःहून विषयांकडे पळत नाहीत. त्याला त्या विषय रुपी रस्त्यावर चालविते ते म्हणजे मन होय. इंद्रिय आपल्या दिसू शकतात. विषय त्या हून सूक्ष्म जे जाणवतात, त्याहून सूक्ष्म हे आपले मन आहे. आपण मागे पहिल्या प्रमाणे आतले संस्कार आणि बाह्य विश्वाचे संस्कार यांचे परीक्षण,वर्गीकरण आणि एकसूत्रीकरण करण्याचे साधन म्हणजे मन होय. मन आपल्याला दिसत नाही परंतु विचार, स्मरण,वासना, प्रवृती,आवडनिवड यांचा समावेश मनामध्ये होत असतो
कामः सङ्कल्पो विचिकित्सा श्रद्धाऽश्रद्धा
धृतिरधृतिर्ह्रीर्धीर्भीरित्येतत्सर्वं मन एव । तस्मादपि
पृष्ठत उपस्पृष्टो मनसा विजानाति !!
बृहदारण्यक १.५.३
अर्थ
इच्छा, कल्पना, संशय,श्रद्धा, अश्रद्धा, धैर्य, अधिरपणा, लज्जा,संकोच,बुध्दी, भय हे सर्व मनच आहे. कोणी नकळत आपल्या पाठीला स्पर्श जरी केला तरी आपण ते मनानेच जाणतो.
संकल्प विकल्प करणे हे मनाचे कामच आहे. मन चंचल असते ते निर्णय करू शकत नाही म्हणून बुध्दी विचार करते आणि निर्णय घेते. बुध्दी मनाहून सूक्ष्म आहे. बुद्धीला खूपच महत्त्व आहे परंतु बुध्दीला मनाचे आणि इंद्रियांचे साह्य नसेल तर ती निर्बल आहे. बुद्धीने ठरवलेला योग्य निर्णय आचरणात आणण्यासाठी मनाची जी शक्ती लागते तिला प्रवृती असे म्हणतात. बुद्धीला प्रवृत्तीची साथ नसेल तर आचरणात कोणतीही गोष्ट येणे शक्य नसते.
उदाहरण आपण दररोज नाम स्मरण केले पाहिजे हे जरी बुध्दीने ठरविले परंतु तशी मनाची शक्ती किंवा प्रवृत्ती होत नाही तो पर्यंत नामस्मरण घडत नाही कृती होत नाही.
भावना ही प्रवृत्तीच्या शक्ती मागे असते, भावनेच्या मागे असते वासना. अशी बुध्दी, प्रवृती, आणि वासना ही मनाची अंगे परस्परांवर अवलंबून असतात.
त्यासाठी संत, सत्पुरुष सानिध्य व श्रवण आणि अध्यात्म ग्रंथांचे वाचन व चिंतन अत्यावश्यक असते. त्यातून आपली सद् वासना जागृत होते आणि तसे कार्य करण्यास आपण प्रवृत्त होत असतो.
म्हणून संत, सत्पुरुष सांगितले श्रवण, अध्यात्म ग्रंथांचे वाचन, मनन आणि अर्थ सहित आकलन (नुसते पारायण नाही) ही आत्मज्ञान आणि भगवंताचे दर्शन ह्या जीवन ध्येयाची प्रथम पायरीच आहे.आपल्याला उपनिषदांचे ऋषी वारंवार हेच सांगत आहेत.
!! श्रीराम जय राम जय जय राम !!
*संत तुकाराम अभंग*
तपासी तें मन करूं पाहे घात ।
धरोनि सांगात इंद्रियांचा ॥१॥
म्हणोनि कीर्तन आवडलें मज ।
सांडोनियां लाज हेचि करी ॥ध्रु.॥
पाहातां आगमनिगमाचे ठाव ।
तेथें नाहीं भाव एकविध ॥२॥
तुका म्हणे येथें नाहीं वो विकार ।
नाम एक सार विठोबाचें ॥३॥
*अर्थ*
तपश्चर्या करावी असे वाटते परंतू माझे मन इंद्रियांची संगत करतात व काम क्रोधादी विकार निर्माण करुन माझा घात करु पाहतात. म्हणूनच मला किर्तन हे माध्यम आवडले आणि आता सर्व प्रकारची लाज सोडून मी हेच करीत आहे. मी वेदशास्त्र हे पाहिले त्यांचाही शोध करुन पाहिला परंतू त्यांच्यातही मला एकवाक्यता मिळाली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा केवळ नाम या साधनेतच मला कोणताही विकार दिसला नाही त्यामुळे विठोबाचे नामच सर्व साधनांचे सार आहे.”
https://youtu.be/u_oKqgXcAOc?feature=shared
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment