उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प ११ : Upanishad Part 11

 *उपनिषद अभ्यास लेखमाला -*

*पुष्प ११*


*उपनिषदातील संकल्पना ~* 

*जन्म, मृत्यु ,आणि पुनर्जन्म*

===================


उपनिषदात वर्णिलेले प्राणाचे स्वरूप आपण मागील लेखात पाहिले. आपण प्रथम लेखात स्थूल शरीर, प्राण, मनस व आत्मा मिळून जीव बनतो आणि जीव हा मुख्यतः आनंद स्वरूप असल्याने तो आनंदी जीवन जगू इच्छितो हे आपण पाहिले. जीवाचे जन्म आणि मृत्यू हे वासना आणि कर्म यांनी कसा बांधला आहे हे आपण पाहू तसेच उपानिषदे पुनर्जन्म का मानतात ह्याचे कारण सुद्धा आपण या लेखात पाहू.


स्वस्वरूपाचे ज्ञान जो पर्यंत आपणास होत नाही तो पर्यंत जीवास जन्म आणि मरण चुकत नाहीत. आत्मज्ञानाच्या अभावी जीव हा कर्मभूमीस चिकटून राहतो. त्यामुळे त्यास कर्माचे नियम पाळावेच लागतात. कर्माचा कायदा हा व्यक्तिनिरपेक्ष असतो तो सर्व जीवांना समान पद्धतीने लागू होतो. चांगल्या कर्मानी चांगली योनि किंवा गती प्राप्त होते. 


मनोकृतेन आयाति येतस्मिन् शरीरे !

 (प्रश्नोंपनिषद ३.४) 


असे सांगते म्हणजे आपल्या संकलपामुळे, तीव्र इच्छाशक्ती मुळे  मरण समयी आपल्या राहिलेल्या वासना मुळे आपला पुढचा जन्म आपल्याला प्राप्त होतो. 


माणसाचा जन्म आणि मृत्यू होतो म्हणजे नक्की काय होते? 


मृत्यूच्या वेळी स्थूल देह म्हणजे (मन, बुध्दी, चित्त, अहंकार, सूक्ष्म ज्ञानेंद्रिय (श्रोत्र,त्वक, चक्षु , जिव्हा, घ्राण), पाच कर्मेद्रिय, पाच प्राण, अतृप्त वासना, बीज रूप संस्कार, घेऊन पुढील ज्या जीवा मध्ये त्या वासना किंवा संकल्प पूर्ण करण्याची क्षमता असते अश्या प्रकारचं देहा मध्ये हा सूक्ष्म देह संयोग पावतो. त्या ठिकाणी आत्मा रुपी प्राण अधिष्ठान झाल्यावर तो जीव नवीन जन्म होतो. 


हा जीवात्मा पुण्यवान असेल तर म्हणजे शरीरात असताना त्याने चांगले कर्म केले असतील तर त्यास दुसरा चांगलं जन्म चांगल्या कुळात मिळून त्याची साधना पुढे चालू राहते. तेच आपल्याला भगवत गीता सांगते आहे.


वासांसि जीर्णानि यथा विहाय

नवानि गृह्णाति नरोऽपराणि |

तथा शरीराणि विहाय जीर्णा

न्यन्यानि संयाति नवानि देही ||  (गीता २.२२) 


योग्य देह न मिळाल्यास तो जीवात्मा मेघांशी एकरूप होऊन पाऊस पडून खाली येतो, मातीत रुजतो, अन्न बनवून शरीरात जातो, त्यातून वीर्य बनून स्त्रीच्या गर्भाच्या आश्रयाने जन्म घेऊन नवीन शरीर मिळवतो असे छान्दोग्य उपनिषद (अध्याय ५ खंड ३) आपल्या सांगते. जो पर्यंत इच्छा असतात तो पर्यंत वासना ह्या राहणार म्हणून पुनरपि जनन आणि पुनरपि मरण हे चक्र सतत चालू राहते.


ह्यातून सुटका होते का तर होऊ शकते मनुष्य वासना रहित झाला म्हणजे त्यास पुनर्जन्म घावा लागत नाही. तो परमात्मा परब्रह्म शी एकरूप होतो जीवन मरणाच्या चक्रातून सुटतो म्हणून सर्व वासना नष्ट झालेल्या मनुष्याला परमानंद मिळतो.


सर्व सुख आणि दुःख यांचे कारण हे जन्म आणि मरण चक्र आणि वासना आहेत. ज्ञानाने कर्मफल भस्मसात होऊन सर्व वासना सुटल्या मनुष्य आसक्ती रहित जगू लागला म्हणजे तो आनंदी होतो. कर्म बंधनानी आणि वासनांनी मनुष्य बांधला जातो म्हणून जिवंत असतानाच जर तो चांगली कर्म करेल, ज्ञान घेईल तर उत्तम संस्कारांनी पुढे जाईल परंतु फक्त मृतदेहा पुढे नुसती प्रार्थना  करून तो जीवात्मा सदगतीस कसा जाईल बरे? त्याने फक्त जो प्रार्थना करेल त्यास व इतरांस दुःख सहन करण्याची शक्ती मिळेल आणि चांगली कर्म करण्याची बुध्दी होईल. त्यामुळे विद्वान मनुष्य कधीच कुणाच्या जन्म आणि मृत्यू वर आनंद किंवा शोक करीत नाहीत कारण ते फक्त एक स्थित्यंतर किंवा बदल आहे असे आपल्याला श्रीभगवतगीता सांगत आहे.


वासनात्मक जन्म मरणाच्या आणि पुनर्जन्म या अखंड चक्रातून सुटणे आणि आपल्या अखंड आनंदी 

स्व स्वरूपाला जाणणे हेच प्रत्येक जीवाचे अंतिम आणि जीवित कार्य होय. 


श्रीराम जयराम जय जय राम !!


जन्म मृत्यू फार जाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥ सिणलों बहुत करितां येरझारा । रखुमाइऩच्या वरा पावें वेगीं ॥ तुका ह्मणे तूं गा पतितपावन । घेइप माझा सीण जन्मांतर !!

                    संत तुकाराम 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments