उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प १ : Upanishad Part 1

 उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प १


ईश्वरमय मनुष्य - अंत: करणातील आनंदाचा शोध

================================

 

       प्रथम सामान्य मनुष्य म्हणजे काय ते पाहू. या विश्वात अनंत प्रकारचे जीव राहतात. जीव कोणास म्हणावे स्थूल शरीर, प्राण, मनस व आत्मा मिळून जीव बनतो. जीव हा भोक्ता आणि कर्ता आहे तर प्राण आणि मनस या त्याच्या उपाधी आहेत. दहा इंद्रिय साह्याने मनस काम करते. या अनंत जीवातील माणूस ही सर्वात श्रेष्ठ पातळी आहे. सर्वच जीव वासना तृप्ती साठी धडपडतात. त्यांचे आत्मसन्मुख आणि आत्मविन्मुख असे दोन प्रकार पडतात. जीवात मुळात ईश्वराचा अंश असतो. ईश्वर हा मुळात आनंद स्वरूप असतो त्यामुळे जीवाची सारी धडपड ही आनंदासाठी असते. परंतु ईश्वर प्राप्तीचा आनंद हा वासना तृप्तीच्या आनंद पेक्षा अनंत पटीने मोठा आहे. माणूस अंतर्यामी आनंदाचा शोध करणे सोडून देहाची वासना तृप्ती करून आनंद मिळेल या अविद्याच्या भ्रमामुळे त्याच्या मागे लागतो. सर्व वासना नष्ट झालेल्या मनुष्याला परमानंद मिळतो. वासानातृप्ती ही देहाला धरून काळाच्या अधीन आहे म्हणजे सूक्ष्म काळ टिकणारी आहे. 


विश्वव्यापी काम करणारी माया जेव्हा निरनिराळ्या व्यक्तींमध्ये प्रकट होते त्याला अविद्या असे म्हणतात. अविद्या म्हणजे ईश्वराचा विसर होय. जीवाला देह आणि जगत मायेच्या प्रभावाने  खरे वाटणे म्हणजे अविद्या होय. अविद्या मुळे आनंदाचा लोप होतो व अज्ञानाच अंधकार त्याला ग्रासतो. त्यामुळे मी आनंदरूप आत्मा  आहे हे जीव विसरतो. देहाला सुख देणारी वस्तू पैसा, सत्ता, मान, खाणे पिणे घरदार, बायकामुले आपल्या मनासारख्या मिळाल्या तर आपले जीवन आनंदाने भरून जाईल  ही चुकीची कल्पना उराशी घट्ट बाळगून त्यासाठी धडपड करणे हे अविद्येने दृश्य रूप आहे. मी खरा कोण? मी खरे काय करायला पाहिजे, माझे सुख कशात आहेत याचे अज्ञान म्हणजे अविद्या. त्याचा अमलामुळे माणूस अनुभवाने कधीच शहाणा होत नाही अनेक प्रसंगातून जाऊन सुध्दा तो कधी सुधारत नाही. आपला मूळ स्वभाव आनंदी आहे हेच आपण विसरतो. 


आपण मुळात आनंदी आहोत हे कळण्यासाठी अविद्याचे आवरण गळून पाडण्यासाठी सद्गुरू शरण आणि नामस्मरण हेच मार्ग सर्व संतांनी सांगितले आहेत.

 

ईश्वराचे नामस्मरण हेच आपल्याला आनंदाच्या प्रवासाला सुरवात करून देवून व शेवट  पर्यंत पोहचवणार आहे. सद्गुरु नानक ईश्वराकडून काय मागतात तर अपना नाम देवो, अपना नाम देवो वाहिगुरू वाहीगुरू...जसे अनेक संत सांगत आहेत.


 ईश्वराची नामे अनंत आहेत त्यामुळे जीव त्याला कोणत्या नावाने स्मरण करतो म्हणजे श्रीराम, गोविंद, रामकृष्ण हरि , हरि विठ्ठल, वाहिगुरु, रब याला महत्त्व राहत नाही. 


स्वतःच्या अंत:करणात आनंदाचा शोध किती माणसे करतात?  अगदीच बोटावर मोजण्याइतकीच !! 


ईश्वरमय होणे म्हणजे आनंद मय होणे म्हणजे आत्मानंदी होणे होय त्याची वाट सामान्य माणसाला नाम स्मरणाच्या रस्त्याने तर घेऊन जाते..


!!श्रीराम जय राम जय जय राम !!


सुंदर किर्तन - 

  आनंदाचे डोही आनंद तरंग !!! 

      https://youtu.be/NSEDNfxfkyQ


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





Comments