18 shloki Marathi geeta: 18 श्लोकी मराठी गीता

 


गेले कौरव आणि पांडव रणी वर्णी कथा संजय

ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मनें देई तयाते भय

पाही पार्थ रणी कुलक्षय घडे चित्ती विषादा धरी

युद्धापासुनि होऊनी विमुख तै टाकी धनुष्या दुरी ‌- १


झाला अर्जुन शोकमग्न बघुनी वेदान्त सांगे हरी

आत्मा शाश्वत देह नश्वर असे हे ओळखी अंतरी

घेई बाण धनू करी समर तू कर्तव्य ते आचरी

वागे नि:स्पृह हर्ष शोक न धरी ज्ञानी सदा ज्यापरी – २


अगा कर्माहुनी अधिक बरवे ज्ञान म्हणसी

तरी का तू येथे मजकरवी हिंसा करविसी

वदे तेव्हा पार्थाप्रति यदुपती कर्म करणे

फलेच्छा सांडूनी सहज मग ते ज्ञान म्हणणे – ३


हरा या भूभारा अमित अवतारासी धरितो

विनाशूनी दुष्टा सतत निजदासा सुखवितो

नियंता मी भूता समजुनि असे कर्म मजसी

समर्पी तू कर्मी मग तिळभरी बद्ध नससी – ४


करी सारी कर्मे विहित निरहंकार असुनी

त्यजी प्रेमद्वेषा धरुनी समता जो निशिदिनी

जया चिंता नाही पुढील अथवा मागिल मनी

खरा तो संन्यासी स्थिरमतिहि संकल्प सुटुनी – ५


चित्ताचा सखया निरोध करणे हा योग मानी खरा

हा मी हा पर भेद हा कधी नसे चित्ती मुळी ज्या नरा

जो सप्रेम सदा भजे मज जसा जो सर्वभूती सम

ठेवी मद्गत चित्त ज्याहुनी दुजा योगी नसे उत्तम – ६


माझ्या केवळ जाहली प्रकृतिने ही सारी सृष्टी सारी असे

पृथ्वीमाजी सुगंध मीच रस मी तोयांत पार्था वसे

सर्वांतर्गत मी परी नुमजती की ग्रस्त माया बळे

जे चित्ती मज चिंतिती सतत जे तापत्रया वेगळे – ७


सदा ध्याती मातें ह्रदयकमळी जे स्थिर मने

तया मी देहान्ती सुख अमित देतो हरि म्हणे

तरी पार्था माझे निशिदिनी करी ध्यान भजन

मिळूनी मद्रूपी मग चुकविसी जन्म मरण – ८


भक्तीने जल पत्र पुष्प फल की काही दुजे अर्पिले      

तै मातें नर जेवि जे नर सदा मत्कीर्तनी रंगले

पार्था तै मुख धन्य ज्या मुखी वसे मन्नामसंकीर्तन

विष्णो कृष्ण मुकुंद माधव हरे गोविंद नारायण – ९


कोठे देवासि चिंतू जरि म्हणसि असे ऐक माझ्या विभूती

संक्षेपे अर्जुना हे तुज गुज कथितो मी असे सर्वभूती

मी धाता विष्णू मी शिव रवी निगमी साम मी विश्वरूप

माझी सर्वत्र सत्ता जगी असुनि असे दिव्य माझे स्वरूप – १०


पार्थ विनवी माधवासी विश्वरूप भेटवा

म्हणुनिया हरी धरी विराट रूप तेधवा

मांडिला अनर्थ थोर पंडुकुमर घाबरे

म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे – ११


बरी सगुणभक्ति की भजन निर्गुणाचे बरे

पुसे विजय हे तदा हरि वदे तया आदरे

असोत बहु योग ते परिही भक्तियोगाहुनी

नसेच दुसरा तसा सुलभ जो श्रमावाचुनी – १२


क्षेत्रक्षेत्रज्ञ दोन्ही कथुनि मग पुढे कृष्ण पार्थासि सांगे

ज्ञानी त्यातें म्हणावा मज भजुनि कदा जो मदाने न वागे

ऐसा ज्या भेद बाणे प्रकृतिपुरुषिचा सर्व ठायी समत्व

कर्माची ज्यासि बाधा तिळभरही नसे पावला तो प्रभुत्व – १३


पार्था मी जनिता तशीच जननी माया जगत्संतती

जीवा सत्त्वरजस्तमादि गुण हे स्वाभाविक व्यापिती

जो सेवी परि भक्तिने मज तया जे बाधती ना गुण

झाला मत्सम तो प्रियाप्रिय नसे ज्याते नुरे मीपण – १४


उर्ध्वी मूळ तळी अपार पसरे अश्वत्थ संसार हा

छेदाया दृढ शस्त्र एकचि तया नि:संगता भूरुहा

ऐसे ओळखुनी क्षराक्षर मला जे पूजिती भारता

तै होती कृतकृत्य धन्य जगती पावोनि सर्वज्ञता – १५


दैवी प्रकृति लक्षणे मनि धरी धैर्य क्षमा प्रौढता

चित्तस्वास्थ्य दया शुचित्व मृदुता सत्यादि बा भारता

आता दंभ असत्य मत्सरिपणा वर्मी परां बोलणे

काम क्रोध अहंकृती त्यज सदा ही आसुरी लक्षणे – १६


सत्त्वरजस्तम तीन गुणांसह श्रद्धा तप मख दान असे

अशनहि तैसे निज बीजापरि आवडि त्यावरि दृढ बैसे

उत्तम मध्यम अधम जाण ही कर्मे त्यांतुनि सत्त्व धरी

मग ॐ तत्सत म्हणुनि धनंजय ब्रह्मसमर्पण कर्म करी – १७


त्यजू पाहसी युद्ध परी जे प्रकृति करवील तुजकडुनि

तरी वद पार्था परिसुनी गीता रुचते ममता का अजुनि

मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी

कृतार्थ झालो प्रसाद तव हा वचन तुझे मज मान्य हरी – १८

Comments