Sanjveli deva pudhati lavite mi sanjwat -सांजवेळी देवा पुढती लाविते मी सांजवात : महालक्ष्मी चे गीत

Mahalakshmi Geet 

सांजवेळी देवा पुढती लाविते मी सांजवात 

सोनियाच्या पावलाने लक्ष्मी उभी दारात |

सुगंधाने वेडावतो अंगणात माझ्या मरवा

महालक्ष्मीने ल्याला शालू गार ग हिरवा |

पारिजातकाचा गंध माझ्या मना  ग मोहवी 

महालक्ष्मीच्या पायी सोनियांची ग जोडवी|

कोरांटीने ल्याला बघ नववधूचा तजेला 

कटीवरी अंबेच्या ग घागऱ्यांची ही मेखला |

परसदारात  पडला बकुळीचा बाई सडा 

महालक्ष्मीने ल्याला हातात ग हिरवा चुडा |

कोरांटी  ग दारातली अंगअंग फुलली दाट

लक्ष्मीला शोभला ग गोठ पाटल्यांचा थाट |

अष्टमीच्या स्वागताला गुलाब  ग हासला 

बाहू मध्ये लक्ष्मीच्या बाजूबंद ग शोभला |

आसामंत करतो धुंद बहरून ग हा चाफा 

लक्ष्मीला शोभवितो सखे तन्मनी अन् लफा|

अबोली ही धरुनी फेर हसे आपुल्या मनात 

वेल भोकरांचा साज अंबे तुझिया कानात|

रंगीबेरंगी फुलांचा फुलोनीया झाला रथ

महालक्ष्मीला शोभे हिऱ्यामानक्यांची नथ|

वसंताचे आगमन आम्रमंजिरी सांगते 

जडावाचे मंगळसुत्र शोभा सर्वांची वाढते |

महालक्ष्मीच्या स्वागताला रेखियली मी रांगोळी 

लावितेग हळदीकुंकू महालक्ष्मीच्या भाळी|

सांजवेळी देवा पुढती लाविते मी सांजवात 

सोनियाच्या पावलाने लक्ष्मी उभी दारात |


Comments