बा. भ. बोरकर: चपल तुझे चरण जरा - बा. भ. बोरकर - chapal tuze Charan Jara ya ghari stirave - Mahalaxmi Stavan

Mahalaxmi Stavan 



चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे
आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे


कुठुनि कुठे सांग जाशी,
उधळित आनंद राशी
आळवीत गौरवीत दीप राग भावे
चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे


श्रीहरिचे नाभीकमल
ब्रह्मयाचे प्रज्ञास्थल
तृतिय रुद्रनयन तूचि प्रकटिशी प्रभावे
चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे


शककर्त्या शुभ वचनी,
प्रमदांच्या रतिनयनी
सज्जनमन वृंदावनी किति तुला भजावे
चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे


तव चंचल मृदुचरणी
सांकुर कुसुमित धरणी
बघुन मुदित स्थिर चर का मी उगी रहावे
चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे


मम जीवन घुंगुरसर
बांधिन तव पदी सत्वर
क्षण भरी तरी तव चरणी त्या निनादवावे
चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे

Comments