आरती करू संध्याकाळी , ओवाळीती वनमाळी||ध्रु||
गाई चारूनिया आला, तेणे शीन फार झाला |
पहाता हरीच्या मुखकमला, येतो प्रेमाचा उमाळा |
सुंदर रूप याचे किती, जैसी स्वर्गाची दिप्ती |
हास्य ते वदन, कमल ते नयन, भृकुटी किती छान, पहाता मन हे आकळी|| ओवाळीती वनमाळी......||१||
सुकल्या सुमनांच्या माळा, काढुनी ताज्या घालू गळा|
पाहता हरी च्या मुखकमला , वाटे दृष्ट झाली याला|
काढा दृष्ट जरी कोणी याग मिळूनी साजणी लिंब ते लोन टाका उतरून श्री हरी वरून अशा या सांजवेळी || ओवाळीती वनमाळी ||२||
काढुनी धार ती गाईची, आळवूनी वाटी भरु याची|
बदाम केसर वेलची, पोळी केली सायीची |
खाऊनी आराम तू करी शींण हा झाला तुला भारी हरी तू शयन करी तू चरण दास आम्ही शरण हरी रे तुझ्या पदकमळी| ओवाळीती वनमाळी ||३||
Comments
Post a Comment