Shree Ram cradle song - श्री रामाचा पाळणा

भारतीय संस्कृती चे आपण किती गोडवे गावेत थोडेच आहेत...आता एक उदाहरणच देऊन सांगते ...आपल्या कडे सगुण भक्ती ही केली जाते आणि आपण जसे राहतो बोलतो अगदी तसेच देव ही आपल्यासोबत बोलत असतात अशी कल्पना आहे व त्या प्रमाणे आपण देवावर भाव ठेऊन भक्ती करतो.  या भक्तीत मानसे एवढे तल्लीन होतात की देवाला सकाळी उठवताना भूपाळी, रात्री झोपताना शेजारती, त्यांना स्नान घालून चंदन फुले प्रसाद अर्पिण्या पर्यंत  असे कितीतरी रोजचे कार्यक्रम भक्ती भावाने चाललेले असतात. आणि अशातच एखादा उत्सव असेल तर माणूस स्वतः लाही विसरून जातो, पण या परमेश्वराने जे आपल्याला दिले आहे त्याची जाणीव ठेऊन तो अगदी तन्मयतेने देवाचे करतो. 
अश्याच एका सोहळ्या बद्दल मी आज बोलणार आहे.  रामनवमी ! हा  नऊ दिवसांचा उत्सव आपल्याकडे साजरा करतात. उल्हास असतो म्हणूनच उत्सव  साजरा होऊ शकतो हे वेगळे सांगायला नकोच ...
चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल नवमी पर्यंत ९ दिवस आणि ९ रात्र हा  रामाच्या जन्माचा उत्सव साजरा होतो. यात प्रामुख्याने  रामाचे घट बसतात..  रोज सकाळी श्री रामकथा लावली जाते , संध्याकाळी रामरक्षेचे पाठ आणि उपासना, भजन असा पूर्ण दिवस भरगच्च कार्यक्रम असतो. चैत्र शुक्ल नवमीला रामाच्या जन्माचा सोहळा अविस्मरणीय असतो. दुपारी १२ वाजता जेंव्हा सूर्य अगदी डोक्यावर आलेला असतो तेंव्हा रामाचा जन्म होतो व त्या नंतर रामाला पाळण्यात टाकण्याची पद्धत आहे. तसेच बरेच जन यावेळेस वेगवेगळे गाणे, पाळणा, गीते म्हणतात तोच पाळणा मी आज इथे तुमच्या साठी देत आहे. 
या उत्सवाची सांगता ही पालखीची मिरवणूक  द्वादशी ला काढल्या नंतर होते.


१. रामाचा पाळणा

अयोध्या नगरीत आनंद झाला | मातेची पुण्याई आली फळाला | पुत्र रत्ना चा लाभ हा झाला ||ध्रु || जो बाळा जो रे जो.. 

रघुवंशाचा कुलदीपक दीन अनाथांचा असे पालक | गाई वासरांचा असे सेवक | राजा दशरथा चा जीव की प्राण  ||1|| जो बाळा जो रे जो... 

चंद्र सूर्या परी तेजोयमान |पाळण्यात बाळ खेळे थाटात |नाचती नर नारी विसरूनि या भान |अवतार घेऊन आले भगवान ||2|||जो बाळा जो रे जो... 

बारशाचा किती वर्णू सोहळा |ऋषी मुनी सारे झालेत गोळा रत्नजडित हार घालोनी गळा |जोजविती नारी बाळा लडिवाळा || 3||जो बाळा जो रे जो... 

वाढू लागले बाळ दिव्याच्या ज्योती | धनुर्धर विद्या गुरू शिकविती | धर्म रक्षण जशी न्याय निति | दीन दुबळ्याची अंतरी प्रिती ||4||जो बाळा जो रे जो... 

बालपण गेले खेळण्यात |लागली चिंता राजा दशरथा | साजेशी सूनबाई शोधावी आता |क्षणोक्षणी सांगे कौसल्या माता ||5|| जो बाळा जो रे जो... 

जनक पुरी च्या जनक राजाने |गाजावाजा करून थाटामाटाने| सीता स्वयंवर योजिले त्याने |राम तिथे गेले योगायोगाने ||६|| जो बाळा जो रे जो...


२. बाळा जो जो रे


बाळा जो जो रे कुळभूषणा । दशरथनंदना ।
निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥धृ॥

पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी ।
पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥

रत्नजडित पालख । झळके अमोलिक ।
वरती पहुडले कुलदीपक । त्रिभुवननायक ॥२॥

हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।
पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकार ॥३॥

विश्‍वव्यापका रघुराया । निद्रा करि बा सखया ।
तुजवर कुरवंडी करुनिया । सांडिन आपुली काया ॥४॥

येऊनि वसिष्ठ सत्वर । सागे जन्मांतर ।
राम परब्रहा साचार । सातवा अवतार ॥५॥

याग रक्षुनिया अवधारा । मारुनि रजनीचरा ।
जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥

पर्णिले जानकी सुरुपा । भंगुनिया शिवचापा ।
रावण लज्जित महाकोप । नव्हे पण हा सोपा ॥७॥

सिंधूजलडोही अवलीळा । नामे तरतील शिळा ।
त्यावरी उतरुनिया दयाळा । नेईल वानरमेळा ॥८॥

समूळ मर्दूनि रावण । स्थापिल बिभीषण ।
देव सोडविले संपूर्ण । आनंदले त्रिभुवन ॥९॥

राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला ।
दास विठ्ठले ऐकिला । पाळणा गाईला ॥१०॥





३. जो जो जो जो रे रघुराया। निद्रा करी सखया ।।

जो जो जो जो रे रघुराया। निद्रा करी सखया||
जोगी आलासे भेटाया। शशिसम देखुनि काया।।

बाळा जोगी दिसतो सुंदर। मस्तकी जटाभार।।

गळा रुंडमाळाचे हार। शोभे व्याघ्रांबर।। बाळा जो.

भस्म चर्चुनी सर्वांगी। वेष्टिली भुजंगी।।



भूते घेऊनि स्वअंगी। आला प्रेमरंगी।। बाळा जो.

नाका जटेमधुनियां जळ वाहे। मुद्रा लावुनि पाहे।।

मान धरूनियां तो राहे। न कळे कोण आहे।। बाळा जो. ॥३॥

इतुकें ऐकुनियां वचन। हांसले रघुनंदन।।



भावें पदकमळी तल्लीन। गोसावीनंदन।। बाळा जो. ॥४॥

Comments