परम सद्गुरू परमार्थप्रत न्यावी माझी मती ।।
पंचसाधना चेतवुनिया करितो पंचारती ।।
जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु ।।ध्रु ।।
आयुष्यातील सुखदुःखाची मजसी का बाधा ।
जीवन नामक यज्ञातील या दोन्हीही समिधा ।।
परंज्योतीला असोत अर्पण अवघ्या दैवगती ।
पंचसाधना चेतवुनिया करीतो पंचारती ll १।।
तनु निर्वाहा आवश्यक ते यत्ने संपादावें ।
अधिक लाभता सत्पात्री ते दान सुख द्यावे ।।
कधीही ना मी उल्लंघाव्या वेदाज्ञा वा श्रुती ।
पंचसाधना चेतवुनिया करितो पंचारती ।।२।।
जगत दिसावे जगन्नाथमय त्याची करिता सेवा ।
अहंपणाचा भाव मानसी मुळी न उपजावा ।।
तप:साधने नमवावे मी मात्र अविद्येप्रती ।
पंचसाधना चेतवुनिया करितो पंचारती ।।३।।
विहितकर्म मी नित्य करावे आस नसो चित्ती ।
निरिच्छ मानस तरिही असावी उ;उल्हासित वृत्ती ।।
तुझ्या पदाचे तीर्थ ठरावे सहजचि माझी कृती ।
पंचसाधना चेतवुनिया करितो पंचारती ।।४।।
स्वाध्यायाने उमजावी मज माझ्यामधली शक्ती ।
सत्य लाभत सारे यातना उरते अमृतभक्ती ।
अनंत जन्मांसाठी म्हणुनी तुज हि शरणागती ।
पंचसाधना चेतवुनिया करितो पंचारती ।।५।।
जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु ।।
परम सद्गुरू परमार्थप्रत न्यावी माझी मती ।।
पंचसाधना चेतवुनिया करितो पंचारती ।।
जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु ।।ध्रु ।।
See the video Song here
जय जय सद्गुरू सॉंग |
Comments
Post a Comment